लहुजींचे ब्राह्मणीकरण थांबवा ! क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे माहिती | Lahuji Salave Information Marathi - Jay Bhim Talk

Jay Bhim Talk

Jay Bhim Talk Is A Ambedkarite Website On This Page We Provide All Ambedkarite Content

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, October 24, 2024

लहुजींचे ब्राह्मणीकरण थांबवा ! क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे माहिती | Lahuji Salave Information Marathi

क्रांतीवीर वस्ताद लहुजी साळवे माहिती मराठी | लहुजी साळवे माहिती इतिहास | Lahuji Salave Marathi Mahiti

लहुजी राघोजी साळवे हे महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळील एक अग्रणी कार्यकर्ते होते. अस्पृश्यतेचे आणि त्यांचे अधिकार यासंदर्भात फुल्यांच्या सामाजिक, राजकीय जाणिवा जागृत करण्याचे अतुलनीय कार्य सत्यशोधक लहुजी साळवे यांनी केले आहे. सत्यशोधक लहुजींची नाळ फुल्यांशी तोडून देशभक्तीशी जोडण्याचा आटापिटा संघ परिवाराकडून सातत्याने सुरू आहे. बहुजनाची प्रतीकं राष्ट्रवादाशी जोडून हिंदुत्ववादी राजकीय, सांस्कृतिक ब्राह्मणी अजेंडा मजबूत करण्याचा खटाटोप सुरू आहे. संघवादी यंत्रणेकडून बहुजन प्रतीकासंदर्भात सुरू असलेली इतिहासाची मोडतोड उजागर केली नाही, तर भरकटलेल्या पिढीचे साक्षीदार होण्याची पाळी आपल्यावर आल्यावाचून राहणार नाही. सत्यशोधक लहुजी राघोजी साळवे यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1794 साली झाला असून ,17 फेब्रुवारी 1881 साली त्यांचा मृत्यू झाला आहे. लहुजी साळवे यांनी पुण्यातील महात्मा फुले यांच्या वाड्याजवळ 1822 साली आपली तालीम सुरू केली होती.

लहुजींच्या तालमीत केवळ शारीरिक शिक्षणाचे धडे दिले जात नव्हते, तर सामाजिक आणि राजकीय शिक्षणाचे धडे दिल्या जात होते. त्याच तालमीत महात्मा फुले हे प्रशिक्षण घेण्यासाठी नित्यनेमाने येत असत. जोतीबा फुले हे गोविंदराव फुले ह्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचे मुलगे होते. गर्भ श्रीमंताच्या घरात जन्म झालेल्या जोतीबा फुले यांना गरिबी किंवा अस्पृश्यतेचे चटके कधी सोसावे लागलेले नव्हते. परंतु, लहुजीच्या सानिध्यात आल्यापासून लहुजीकडून त्यांना दलित अस्पृश्यांचे प्रश्न, त्यांच्या वेदना जवळून पाहाता आल्या. खर्‍या अर्थाने मानवी अधिकाराची लढाई लढण्याचे बाळकडू जोतीबांना लहुजीकडूनच मिळालेले आहेत. अस्पृश्यांच्या अधिकारासाठी आणि एकूणच मानव मुक्तीसाठी काय केले पाहिजे, याचा रोडमॅप सत्यशोधक लहुजी साळवे यांनी जोतीबांना तयार करून दिला होता. त्याचाच भाग बनून जोतीबांनी भिडे वाड्यात सुरू केलेली अस्पृश्य मुलींची पहिली शाळा होती.

वाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वरील विचार 

अस्पृश्य मुलींच्या शाळेत आपल्या मुली पाठविण्यास कुणीही स्पृश्य तयार नव्हता, तेव्हा सत्यशोधक लहुजी साळवे यांनी स्वतःची नात मुक्ता साळवे आणि मांग वाड्यात आणि महारवाड्यात फिरून मुलींना सावित्री जोतीबा शिकवित असलेल्या शाळेत घेऊन यायचे ऐतिहासिक कार्य केलेले आहे. त्यासाठी अहमदनगर येथे जाऊन मॅडम फरेरा यांच्याकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात घेतलेले मार्गदर्शन या सर्व ठिकाणी सत्यशोधक लहुजी साळवे हे सावित्री-जोतीबा यांच्या सोबत होते; किंबहुना सावित्री-जोतीबाचे ते मार्गदातेच होते.

या संदर्भात महात्मा फुले यांनी आपल्या लिखाणात सत्यशोधक लहुजी साळवे यांना गुरुस्थानी मानले असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळून येतो. मांगास बहुत पिडले सजीव दडविले गडीच्या पाया, श्लेष उरले उष्टे मागा नाही ज्यागती आर्यन्यायात. मांगानो, सकळ कळा झाल्या अवकळा पुसा मनाला, मातंगानो, तुम्ही राजे आहात सत्ता मिळवा वगैरे सारखे जोतीबाचे किंवा मुक्ता साळवे यांनी 1855 साली ज्ञानोदय मध्ये लिहिलेला ‘मांगा-महारांच्या दु:खाचा निबंध’ असे जे साहित्य लिखाण आहे त्यावर लहुजी साळवे यांच्या विचारांची छाप दिसून येते. लहुजीसारखे अस्पृश्योधारक मार्गदर्शक सावित्री-जोतीबा यांच्या खांद्याला खांदा देऊन समाजात सत्यशोधकी विचाराची रुजुवात करण्यासाठी धडपडत होते, असे ते मार्गदाते प्रतिगामी, ब्राह्मणी राजवट समाजावर लादणार्‍या पेशव्यांसोबत कसे काय असू शकतात, असा साधा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.

हेही पाहा: मातंग समाज आणि बौध्द धम्म 

सत्यशोधक लहुजी साळवे यांचा 17 फेब्रुवारी रोजी स्मृतिदिन असून, सत्यशोधकाच्या 141 वा स्मृतिदिना निमित्ताने बहुजन प्रतीकाच्या संदर्भात मांडण्यात येणार्‍या कपोलकल्पित इतिहासाची पोलखोल करणारे काही ऐतिहासिक दाखले दिले पाहिजेत. आपण असे केले नाही, तर खोटा इतिहास बहुजनांच्या माथी मारून लहुजींसारखी पुरोगामी क्रांतिकारी बहुजन प्रतीकं प्रतिगामी वळचणीला जाण्याचा धोका असून, अशा खोट्या इतिहासाची पारायणे करण्याची सजा आमच्या येणार्‍या पिढ्यांना भोगावी लागणार आहे. सत्यशोधक लहुजींच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने राज्यभरातील दलित बहुजन समाजातील कार्यकर्ते लहुजींना अभिवादन करण्यासाठी पुणे स्थित संगमवाडी येथील सत्यशोधक लहुजी साळवे यांच्या समाधीस्थळी हजारोंच्या संख्येने दरवर्षी दाखल होत असतात. त्या ठिकाणी होणारी भाषणं देशप्रेमानं ओसंडून वाहाणारी अशीच असतात. टिळक, आगरकर, वासुदेव बळवंत फडके यांचे गुरू म्हणून लहुजीबाबांना पेश करण्यात येते.

लहुजीचा कार्यकाळ त्यांची थिंक लाईन आणि टिळक फडक्यांची सनातनी मनोवृत्ती कुठे जुळत नसताना, कुठल्या कुठे ठिगळं जोडण्याची कसरत याठिकाणी पुढार्‍यांकडून ऐकायला मिळते. दरम्यान, सोशल मीडियावर लहुजी बाबांना अभिवादन करणार्‍या हजारो पोस्ट सोशल मीडियावर झळकताना पाहायला मिळतात. फेसबुक व्हॉट्सअ‍ॅपवरील हजारो पोस्टमध्ये जगेल तर देशासाठी आणि मरेल तर देशासाठी हे वाक्य लहुजींच्या तोंडी डकविल्या जाते. लहुजी साळवे हे जर का इंग्रजाच्या विरोधात लढले असतील, तर मग इंग्रजांनी त्यांना खुले सोडले कसे? त्यांना पकडल्याचा, शिक्षा झाल्याचा इतिहास आहे का? लहुजी कधीही इंग्रजांच्या विरोधात लढलेले नसताना देशभक्तीचा कपोलकल्पित इतिहास मांडून त्यांचा सत्यशोधकी इतिहास दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. लहुजींचे अजरामर सत्यशोधकी कार्य समाजासमोर आणण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील पुरोगामी विचारवंत आणि इतिहासकारांकडून होत नाही, याचा खेद वाटतो.

वाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी पुर्ण माहिती आणि त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या

सत्यशोधक लहुजीबाबांची फरफट थांबविण्यासाठी काही ऐतिहासिक संदर्भ देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत. जसे की, मोठमोठ्या विद्वानांच्या पोस्टमध्ये जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी, असे वाक्य लहुजी बाबांच्या तोंडी घातल्याचे वाचायला मिळते आहे. हे वाक्य कधी आणि कुणाकडे, कुणासमोर म्हटले आहे? कुठल्या पुस्तकात लहुजीबाबांनी लिहून ठेवले आहे? किंवा कोणत्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे? जगेल तर देशासाठी… चा आम्हाला असा इतिहास सांगितला जातो की, 1817 साली झालेल्या खडकीच्या युद्धात लहुजींचे वडील राघोजी साळवे हे इंग्रजांच्या विरोधात लढताना धारातीर्थी पडले आणि युद्धभूमीवर शहीद झालेल्या वडिलांच्या पार्थिवा समोर लहुजी साळवे यांनी जगेल तर देशासाठी मरेल तर देशासाठी अशी शपथ घेतली होती. राघोजी साळवे त्यांच्या लहुजी नावाच्या दहाबारा वर्षाच्या मुलाला युद्धभूमीवर घेऊन आले होते? इतर कोणकोणते योद्धे युद्धभूमीवर त्यांच्या लहान मुलांना सोबत घेऊन आले होते आणि त्यांच्या मुलांनी काय शपथा घेतल्या? याचा मात्र, इतिहास आम्हाला सांगितला जात नाही. युद्धभूमी लेकराबाळाला फिरायला घेऊन जाण्याचे ठिकाण असते काय? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. परंतु, आम्ही आमची सद्सद्विवेकबुद्धी गहाण टाकून त्यांनी सांगितलेला त्यांच्या सोयीचा इतिहास चघळत बसून प्रतिगामी शक्तीला बळकट करण्याचे पाप करत आहोत. दुसरा मुद्दा आहे सदरच्या लढाई प्रसंगी रणमैदाणावर लहुजी साळवे यांनी घेतलेल्या भीष्म प्रतिज्ञेचा. लढाई होती संस्थानिक पेशवे विरुद्ध ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी. कारण त्या काळी देशासाठी कुणीही लढत नव्हते, तर आपापले संस्थान वाचविण्यासाठी झालेल्या त्या सर्व लढाया होत्या. मग, लहुजी साळवे हेच काय एकटे देशासाठी लढत होते काय? कोण कुणासोबत कुठे आणि केव्हा लढले आहे याचा इतिहास बघितल्यानंतर त्याकाळी देश ही संज्ञाच नव्हती हे सिद्ध होईल.

जसे की, 

  1. पानिपतची लढाई-1761 मराठा साम्राज्य विरुद्ध बाबर इब्राहिम लोधी, राजा विक्रमजीत यांच्यात झालेली लढाई. 
  2. वांदीवाशची लढाई (कर्नाटक)-1756-1763 इंग्रज विरुद्ध फ्रेंच यांच्यात झालेली लढाई.
  3.  प्लासीची लढाई(हुबळी, बंगाल)-1757 बंगालचा नबाब सिराजउदोला विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेली लढाई. 
  4.  पानिपतची तिसरी लढाई-1761. मराठा साम्राज्य विरुद्ध दुर्राणी साम्राज्य, अवधचे नबाब, रोहिले यांच्यात झालेली लढाई.
  5.  बक्सरची लढाई-1764 ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध नबाब मीर कासिम, अवधचे नबाब शुजा उदौला, मुघल बादशहा शाह आलम, काशीचा राजा बलवंतसिंग यांच्यात झालेली लढाई.
  6.  मैसूरची लढाई- 1799 टिपू सुलतान विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी, निजाम, मराठे यांच्यात झालेली लढाई. 
  7. आसईची लढाई-1803 मराठा सरदार शिंदे विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी, बाजीराव पेशवे, पटवर्धन, पाटणकर, निपाणकर, बापू गोखले, मैसूरकर यांच्यात झालेली लढाई. 
  8. हडपसरची लढाई-1802 यशवंतराव होळकर विरुद्ध बाजीराव पेशवे यांच्यात झालेली लढाई.
  9.  मराठा इंग्रज लढाई दुसरी-1803 ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध दौलतराव शिंदे, यशवंतराव होळकर, राघोजी भोसले यांच्यात झालेली लढाई. 
  10. महिंदपूरची लढाई-1817 ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध होळकर यांच्यात झालेली लढाई. 
  11. खडकीची लढाई-1817 ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध बाजीराव पेशवे यांच्यात झालेली लढाई. 
  12. भीमा कोरेगाव लढाई-1818 बाजीराव पेशवे विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेली लढाई.

हेही पाहा: जेव्हा 500 महारांनी 26000 पेशव्यांना मारले |भीमा कोरेगाव लढाई चा इतिहास 

वरील काही लढाया या ठिकाणी नमुन्या दाखल दिलेल्या आहेत. यावरून स्पष्ट होते भारताच्या भूमीवर झालेल्या सर्वच लढाया स्वातंत्र्य संग्राम दाखवून आपला वुल्लू सिधा करण्यात येतो, त्याला बहुजनांनी बळी पडायला नको. यातील अनेक लढायात मराठे, पेशवे, निजाम हे इंग्रजांच्या बाजूने लढले आहेत. कारण त्या काळी देश म्हणून कुणीही लढाया करत नव्हतं, तर संस्थानिक म्हणून संस्थान वाचविण्यासाठी सोईचे राजकारण, तह, लढाया करत होते; परंतु इकडं बहुजन समाजाला मात्र देश या संकल्पनेत अडकवून मुर्ख बनविल्या जात आहे. पेशवे विरुद्ध इंग्रज यांच्यात खडकी आणि कोरेगाव भीमा येथे झालेली लढाई देशासाठी होती, तर मग टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज, मराठे, निजाम यांच्यात झालेली मैसूरची लढाई देशासाठी होती का? मराठा सरदार शिंदे भोसले विरुद्ध इंग्रज आणि ह्या लढाईत इंग्रजांच्या बाजूनं लढणारे बाजीराव पेशवे, पटवर्धन, पाटणकर, निपाणकर, बापू गोखले यांच्यात झालेल्या आसईची लढाई देशासाठी झालेली होती का? सारांश, देशातील मातंग, भिल्ल, रामोशी, आदिवासी समूह इंग्रजांच्या विरुद्ध लढला ह्याचा इतिहास खरा असला, तरी तो देशासाठी नसून स्वतःच्यावर होणार्‍या अत्याचाराच्या विरोधात लढलेला आहे किंवा संस्थानिकांच्या बाजूने लढलेला आहे. परंतु, जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी वगैरे म्हणजे पेशवाईशी जोडणे असून सत्यशोधक लहुजींना महात्मा जोतीबा फुले, सावित्रीमाई फुले, बहुजन उद्धारक राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जातकुळीपासून तोडण्याचे षढयंत्र आहे, लहुजींचा सत्यशोधकी इतिहास दडपण्याचे कुटील कारस्थान आहे. प्रतिगामी, सनातनी, ब्राह्मणी व्यवस्था मजबूत करण्याच्या आणि ‘परमं वैभव नेत्मेत्त राष्ट्र’ संकल्पनेसाठी झटणार्‍या संविधान विरोधी शक्तीपासून लहुजींची सुटका करण्यासाठी कपोलकल्पित तथ्यहीन देशभक्तीचा मोह टाळला पाहिजे. अशा मोहात केवळ लहुजी साळवे आणि त्यांची मांग जात अडकत आहे, असे समजून दुर्लक्ष करता येणार नाही, तर देशातील 3000 प्रमुख जाती आणि 25000 उपजाती आणि त्यांची प्रतीके यापैकी बहुतांश अशा मोहाला बळी पडले आहेत.

*हा लेख प्रबुध्द भारत च्या एक लेख आहे 

या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages