म. फुले लिखीत छ. शिवाजी महाराजांचा पोवाडा भाग - 3 | Shivaji Maharaj Povada

छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा - महात्मा फुले भाग - 3 |छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा | Chhatrapati Shivaji Maharaj Powada

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन क्रांतीसुर्य महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.

छ. शिवाजी राजांचा पोवाडा

जाहागीरचा पैसा सारा लावी खर्चास ।

चाकरी ठेवी लोकांस ॥

थाप देऊन हातीं घेई चाकण किल्ल्यास ।

मुख्य केले फिरंगोजीस ॥

थोडया लोकांसहित छापा तीनशे घोडयास ।

करामत केली रात्रीस ॥

मुसलमानां लांच देई घेई कोंडाण्यास ।

सिंहगड नांव दिले त्यास ॥

पुरंधरी जाई जसा भला माणूस न्यायास ।

कैद पाहा केलें सर्वास ॥

गांव इनाम देऊन सर्वा ठेवी चाकरीस ।

मारलें नाहीं कोणास ॥

वाटेमधीं छापा घालून लुटी खजीन्यास ।

सांठवी राजगडास ॥

राजमाचीं लोहगडी लढे घेई तिकोण्यास

बाकी चार किल्ल्यांस ॥

मावळयांस धाडी कोकणीं गांव लुटायास ।

धूर्त योजी फितूरास ॥

सन्मान कैद्यां देई पाठवि वीजापुरास ॥

मुलान्या सुभेदारास ॥

विजापुरी मुसलमाना झाला बहु त्रास ।

योजना केली कपटास ॥

करनाटकीं पत्र पाठवी बाजी घोरपडयास ।

कैद तुम्ही करा शहाजीस ॥

भोजनाचें निमित्य केलें नेलें भोसल्यास ।

दग्यानें कैद केलें त्यास ॥

थेट शहाजी कैदी आणिला विजापूरास ।

खुशी मग झाली यवनास ॥

चिरेबंदी कोठडीमध्ये बंद केले त्यास ।

ठेविलें भोक वा-यास ॥

शाहाजीला पिडा दीली कळलें शिवाजीस ।

ऐकून भ्याला बातमीस ॥

पिताभक्ति मनीं लागला शरण जायास ।

विचारी आपल्या स्त्रियेस ॥

साजे नाव सईबाई स्त्री सुचवी पतीस ।

ताडा दंडीं दुसमानास ॥

स्त्रीची सुचना सत्य भासली लिहिलें पत्रास ।

पाठवी दिल्ली मोगलास ॥

चाकर झालों तुमचा आतां येतों चाकरीस

सोडवा माझ्या पित्यास ॥

मोगल थैली गेली थेट मुसलमानास ।

ठेविले किल्ल्यावर त्यास ।

बाजी शामराज कां लाजला जात सांगायास ।

धरुं पाही शिवाजीस ॥

धेड ह्रणावा नाक नाहीं द्यावा कोणास ।

अडचण झाली बखरीस ॥

सिद्विस बेत गेला नाही अंती भ्याला जिवास ।

काळे केलें महाडास ॥

शाहाजीचा बाजी आखेर घेईल बक्षीस ।

हा पाजी मुकला जातीस ॥

करनाटकीं आज्ञा झाली शाहाजीस ।

यवन भ्याला सिंहास ॥

वर्षे चार झाली शिवला नाही कबजास ।

पिताभक्ति पुत्रास ॥

चंद्रराव मो-यास मारी घेई जावळीस ।

दुसरे वासोटया किल्ल्यास ॥

प्रतापगड बांधी पेशवा केला एकास ।

नवे योजी हुद्यास ॥

आपली बाकी काढी धाडी पत्र तगाद्यास ।

चलाखी दावी मोंगलास ॥

रात्रीं जाऊन एकाएकीं लुटी जुन्नरास ।

पाठवि गडी लुटीस ॥

आडमार्ग करी हळुच गेला नगरास ।

लुटी हत्तीघोडयांस ॥

उंच वस्त्रे, रत्नें होन कमती नाहीं द्रव्यास ।

चाकरी ठेवि पठाणास ॥

सिद्दी पेशव्या आपेश देई घेई यशास ।

उदासी लाभ शिवाजीस ॥

आबजूलखान शूर पठाण आला वांईस ।

शोभला मोठा फौजेस ॥

हत्ती बारा हजार घोडा त्याचे दिमतीस ।

कमी नाहीं दारुगोळीस ॥

कारकुनाला वचनीं दिलें हिंवरें बक्षीस ।

फितिवले लोभी ब्राह्यणांस ॥

गोपीनाथ फसवी पठाणा आणी एकांतास ।

चुकला नाहीं संकेतास ॥

माते पायीं डोई ठेवी, लपवी हत्यारास ।

बरोबर आला बेतास ॥

समीप येतां शिवाजी जसा भ्याला व्याघ्रास ।

कमी करी आपल्या चालीस ॥

गोपीनाथ सुचना देई भोळ्या यवनास ।

भ्याला तुमच्या शिपायांस ॥

त्या अधमाचें ऐकून शिपाई केला बाजूस ।

लागला भेटूं शिवाजीस ॥

वर भेदभाव वाघनख मारीं पोटास ।

भयभित केलें

पोटीं जखम सोसी केला वार शिवाजीस ।

झोंबती एकमेकांस ॥

हातचलाखी केली बिचवा मारी शत्रूस ।

पठाण मुकला प्राणास ॥

स्वामीभक्त धाव घेई कळले शिपायास ।

राहिला उभा लढण्यास ॥

त्याची घोप घेई शिवाजी बचवी आपल्यास ।

तान्हाजी भिडे बाजूस ॥

दांती दाढी चावी तोडी घेई धनी सूडास ।

घाबरें केलें दोघांस ॥

नांव सय्यदबंधू साजे शोभा आणी बखरीस ।

लाथाळी जीवदानास ॥

तान्हाजिला हूल देई मारी हात शिवाजीस ।

न्याहाळी प्रेती धण्यास ॥

उभयतांसी लढतां मुकला आपल्या प्राणास ।

गेला जन्नत स्वर्गास ॥

छापा खाली मारी करी कैद बाकी फौजेस ।

पठाणपुत्र खाशा स्त्रियेस ।

चार हजार घोडा लूट कमी नाही द्रव्यास ।

दुस-या सरंजाषास ॥

अलंकार वस्त्रे देई सर्व कैदी जखम्यांस ॥

पाठवि विजापूरास ॥

वचनीं साचा शिवाजी देई हिवरेम बक्षीस ।

फितु-या गोपीनाथास ॥

नाचत गात सर्व गेले प्रतापगडास ।

उपमा नाहीं आनंदास ॥

॥चाल॥

॥शिवाचा गजर जयनामाचा झेंडा रोविला ॥

॥क्षेत्य्राचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला ॥

माते पायीं ठेवी डोई गर्व नाहीं काडीचा ।

आशिर्वाद घेई आईचा ॥

आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।

पवाडा गातो शिवाजीचा ॥

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।

छत्रपती शिवाजीचा ॥3॥

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 4 साठी येथे क्लिक करा!

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा भाग - 2 साठी येथे क्लिक करा!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पोवड्याचे सर्व भाग साठी येथे क्लिक करा!

या लेखा मध्ये काही चुक झाली असेल तर खाली दिलेल्या E-mail वर आम्हाला कळवा.

जर तुमच्याकडील काही लेख, आंबेडकरी चळवळीतील काही माहिती , जुन्या भीम गीतांचे Lyrics किंवा काहीही Suggestion असतील तर आम्हाला Instagram वरती मेसेज करून किंवा inquiry@jaybhimtalk.in येथे क्लिक करून मेल करा. जय भीम 

आम्हाला Instagram वर फॉलो करा!

आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर ती नक्की शेअर करून आम्हाला Support करा.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form